2 Kings 4

1आता संदेष्ट्यांच्या मुलांच्या बायकांतली एक अलीशाकडे रडत आली, आणि म्हणाली, “तुझा सेवक माझा नवरा मरण पावला आहे, आणि तुला माहित आहे की, तुझा सेवक परमेश्वराचे भय राखत होता. पण आता सावकार माझ्या दोन मुलांना त्याचा गुलाम करून घ्यायला नेण्यासाठी आला आहे.” 2तेव्हा अलीशा तिला म्हणाला, “मी तुला काय मदत करु शकतो? तुझ्या घरात काय आहे ते मला सांग.” तेव्हा ती बाई म्हणाली, “एका तेलाचा बुधला सोडला तर तुझ्या दासीच्या घरात काहीच नाही.”

3तेव्हा अलीशा म्हणाला, “आता जा आणि तुझ्या शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी उसने मागून आण. जितके शक्य होतील तितके उसने आण. 4मग घराचे दार आतून लावून घे. फक्त तू आणि तुझी मुलेच घरात राहा. ते सगळे तेल या रिकाम्या भांड्यामध्ये ओत आणि ती सगळी भरलेली भांडी एकाबाजूला ठेव.”

5मग ती बाई अलीशाकडून निघून आपल्या घरी आली व तिने आपल्या मागून व आपल्या मुलांच्या मागून दार आतून लावून घेतले. त्यांनी तिच्याकडे भांडी आणली आणि ती त्यात तेल ओतत गेली. 6अशी अनेक भांडी भरली शेवटी ती आपल्या मुलाला म्हणाली, “आणखी एक भांडे घेऊन ये.” पण तो तिला म्हणाला, “आता एकही भांडे उरले नाही” त्यावेळी बुधल्यातले तेल संपले.

7मग ती अलीशाकडे आली आणि तिने त्या परमेश्वराच्या माणसाला हे सांगितले. अलीशा तिला म्हणाला, “आता हे तेल विक आणि कर्जफेड कर, आणि उरलेल्या पैशावर तू आपल्या मुलांचा निर्वाह कर.”

8एकदा अलीशा शूनेम येथे गेला. तेथे एक प्रतिष्ठित बाई राहत होती. तिने अलीशाला आपल्या घरी येऊन जेवायचा आग्रह केला. त्यामुळे अलीशा जेव्हा तिकडून जाई तेव्हा त्या बाईकडे जेवणासाठी थांबत असे. 9तेव्हा ती बाई आपल्या नवऱ्याला म्हणाली, “पाहा, मला आता कळाले आहे की, आपल्या येथे नेहमी येतो तो अलीशा, परमेश्वराचा पवित्र माणूस आहे.

10तेव्हा त्याच्यासाठी वर एक लहानशी खोली बांधू या, त्यात एक पलंग, मेज व बैठक आणि दिव्याची सोय पण करु. म्हणजे तो जेव्हा येईल तेव्हा त्याला थांबायला ही खोली होईल.” 11मग एके दिवशी अलीशा त्या घरी आला तेव्हा त्याने त्या खोलीत आराम केला.

12तेव्हा अलीशाने आपला सेवक गेहजी याला, “त्या शूनेमच्या बाईला बोलावून आणायला सांगितले.” त्याप्रमाणे गेहजीने त्या बाईला बोलावले, ती येऊन अलीशा पुढे उभी राहिली. 13अलीशा त्याला म्हणाला, तिला सांग की, “तू आमची चांगली काळजी घेतली आहेस. तेव्हा मी तुझ्यासाठी काय करु? तुझ्यासाठी राजाशी किंवा सेनापतीशी बोलू का?” ती म्हणाली, “मी माझ्या लोकांमध्ये राहते.”

14तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “मग आपण तिच्यासाठी काय करु शकतो?” गेहजी म्हणाला, “तिला खरोखर मूलबाळ नाही आणि तिचा नवरा वृध्द आहे.” 15मग अलीशा म्हणाला, “तिला बोलाव” गेहजीने पुन्हा तिला बोलावले, तेव्हा ती येऊन दाराशी उभी राहिली. 16अलीशा तिला म्हणाला, “पुढील वसंत ऋतुत याच सुमारास तू आपल्या मुलाला उराशी धरशील.” ती म्हणाली, “नाही, माझ्या स्वामी, तुम्ही परमेश्वराचे माणूस आहात, माझ्याशी खोटे बोलू नका.”

17पण ती बाई गरोदर राहिली आणि अलीशा म्हणाला त्याप्रमाणेच वसंत ऋतूच्या समयी तिने मुलाला जन्म दिला. 18मुलगा मोठा झाल्यावर, एके दिवशी तो आपल्या बापाजवळ जो कापणी करणाऱ्यां लोकांना सोबत होता तेथे गेला. 19तो वडिलांना म्हणाला, “माझे डोके, माझे डोके.” यावर त्याचे वडिल आपल्या नोकराला म्हणाले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.” 20नोकराने मुलाला त्याच्या आईकडे पोचवले. दुपारपर्यंत हा मुलगा आईच्या मांडीवर बसला होता नंतर तो मेला.

21तेव्हा त्या बाईने आपल्या मुलाला परमेश्वराच्या माणसाच्या पलंगावर ठेवले व खोलीचे दार लावून ती बाहेर गेली. 22तिने नवऱ्याला हाक मारुन म्हटले, “कृपाकरून एक नोकर आणि एक गाढव माझ्याकडे पाठव, म्हणजे मी ताबडतोब जाऊन परमेश्वराच्या माणसाला भेटून येते.”

23त्या बाईचा नवरा तिला म्हणाला, “आजच त्याच्याकडे का जातेस? आज चंद्रदर्शन नाही, की शब्बाथही नाही.” ती म्हणाली, “सगळे ठीक होईल.” 24मग गाढवावर खोगीर चढवून ती नोकराला म्हणाली, “आता पटकन चल आणि मी सांगितल्या शिवाय माझ्यासाठी वेग कमी करु नको!”

25मग ती निघून कर्मेल डोंगरास परमेश्वराच्या माणसाकडे आली. अलीशाने तिला दुरुनच येताना पाहिले, तेव्हा त्याने गेहजी या आपल्या नोकराला म्हटले, “बघ, ती शूनेमची बाई येतेय. 26कृपाकरून तिला भेटायला धावत जा आणि तिला विचार, तू व तुझा नवरा, तुझा मुलगा, हे सर्व ठीक आहेत ना?” ती म्हणाली, सर्वकाही ठीक आहे.

27आणि तिने डोंगरावर देवाच्या माणसाजवळ जाऊन त्याचे पाय धरले. तेव्हा तिला ढकलण्यास गेहजी जवळ आला, पण परमेश्वराच्या माणसाने म्हटले, “तिला एकटे सोड, ती काळजीत आहे. परमेश्वराने हिची समस्या माझ्यापासून लपवली आहे, मला काहिच कळवले नाही.”

28तेव्हा ती म्हणाली, “माझ्या स्वामी, मी तुझ्याजवळ मुलगा मागितला होता काय? ‘मला फसवू नको’ असे मी म्हटले नव्हते काय?” 29तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “निघायची तयारी कर व तुझ्या हातात माझी काठी घे, आणि तिच्या घरी जा. जर तुला कोणी भेटला तर त्याला सलाम करू नको, आणि कोणी तुला सलाम केला तर त्याला उत्तर देऊ नको. आणि माझी काठी त्या मुलाच्या तोंडावर ठेव.”

30पण मुलाच्या आईने म्हटले, “परमेश्वराची आणि तुमची शपथ मी तुम्हाला सोडणार नाही!” तेव्हा अलीशा उठला आणि तिच्या मागून निघाला. 31गेहजी त्यांच्या आधी घरी जाऊन पोहचला व त्याने त्या मुलाच्या तोंडावर काठी ठेवली पण ते मूल काही बोलले नाही किंवा कोणतीच हालचाल केली नाही. तेव्हा गेहजी परत अलीशाकडे गेला व त्याला म्हणाला, “मूल काही जागे झाले नाही.”

32जेव्हा अलीशा घरात आला ते मूल मेलेले व त्याच्या अंथरुणावर निपचीत पडले होते. 33अलीशाने खोलीत शिरुन दार लावून घेतले. आता खोलीत ते मूल आणि अलीशा अशी दोघेच होती. अलीशाने मग परमेश्वराची प्रार्थना केली. 34अलीशा त्या मुलाच्या अंगावर पालथा पडला. त्याने आपले तोंड मुलाच्या तोंडावर आणि डोळे मुलाच्या डोळ्यावर, आपले हात त्याच्या हातावर ठेवले. अशा प्रकारे अलीशाने त्या मुलावर पाखर घातल्यावर त्या मुलाच्या अंगात ऊब निर्माण झाली.

35मग अलीशा उठला आणि घरात इकडेतिकडे फिरला. मग पुन्हा वर येऊन मुलावर पाखर घातली. मुलाला एका पाठोपाठ सात शिंका आल्या आणि त्याने डोळे उघडले. 36अलीशाने गेहजीला हाक मारुन त्या शूनेमकरिणीला बोलवण्याला सांगितले. त्याने तिला बोलविल्यावर ती खोलीत आल्यावर, अलीशा तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला उचलून घे.” 37मग तिने जमिनीपर्यत पालथे पडून त्याला नमन केले व मुलाला उचलून घेऊन बाहेर आली.

38अलीशा गिलगाल येथे परत आला. तेव्हा त्या देशात दुष्काळ पडला होता. संदेष्ट्यांचे शिष्य त्याच्यासमोर बसले होते. तो आपल्या सेवकाला म्हणाला, “एक मोठे पातेले अग्नीवर ठेव आणि या संदेष्ट्यांसाठी शाकभाजी कर.” 39त्यातील एकजण रानात शाकभाजी गोळा करून आणावयास गेला. तेव्हा त्याला एक रानवेल दिसला व त्याची फळे तोडून आपल्या ओटीत भरून, त्याने ती फळे कापून भांड्यात टाकली. परंतु ती कडू होती हे त्यांना माहित नव्हते.

40मग ही शाकभाजी सर्वाना खाण्यासाठी वाढली. ती खाताच सर्वजण ओरडून म्हणाले. “देवाच्या माणसा, या भांड्यात तर मरण आहे.” त्यांना ते खाता येईना. 41तेव्हा अलीशा म्हणाला, “थोडे पीठ आणा.” पीठ आणून दिल्यावर त्याने ते मोठ्या भांड्यात घातले. मग अलीशा म्हणाला, “आता हे सगळ्यांना वाढा.” आता त्यात काही अपायकारक राहिले नाही.

42बआल-शालीश येथून एकदा एक माणूस आपल्या नव्या पिकातील जवाच्या वीस भाकरी देवाच्या माणसासाठी घेऊन आला. तसेच कोवळी कणसे पोत्यातून घेऊन आला. तो म्हणाला, “हे सर्व या लोकांना खायला दे.” 43त्याचा सेवक म्हणाला, “शंभर माणसांना हे कसे पुरणार?” पण अलीशा म्हणाला, “तू ते सर्वांना वाटून दे. परमेश्वर म्हणतो, त्यांनी खाल्ल्यावर त्यातून काही उरेल.” मग त्याच्या सेवकाने त्यांच्यासमोर ते अन्न ठेवले. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी ते खाल्यावरही काही उरलेच.

44

Copyright information for MarULB